नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): येत्या खरीप हंगाम-2023 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात महाबीजमार्फत ज्युट, उडिद, मुग, सोयाबीन, तीळ, तुर, नागली पिकांसाठी सीड प्लॉट योजना राबविण्यात येत आहे. यासाठी  जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बी. जी. कोटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सीड प्लॉटसाठी आवश्यक असलेले पायाभूत बियाणे बिजोत्पादकांना महाबीजमार्फत योग्य किंमतीत देण्यात येवून पिकाचे उत्पन्न झाल्यावर संपूर्ण उत्पन्न महाबीज परत विकत घेते. सीड प्लॉटसाठी पायाभूत उच्च दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होत असून बाजारभावापेक्षा दरही 20 ते 25 टक्के जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. तसेच चांगले बियाणे उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांना गुणवत्ता निकषावर 75 ते 125 रुपये प्रति क्विटल वाढीव भाव दिला जातो. यात महाराष्ट्र शासनाने नवीन वाणांना बियाणे उत्पादनात सबसिडी देण्यात येत असल्याने त्यांचा सुध्दा फायदा बियाणे उत्पादकांना होईल. यासाठी एका गावात सर्व पिके मिळून 25 एकर एवढे सिड प्लॉट असणे आवश्यक आहे.

येत्या खरीप हंगामासाठी खासकरुन ज्यूटचे बियाणे उत्पादन प्लॉट देण्याचे महाबीजने निश्चित केलेले आहे. ज्यूट पिकाचे बियाण्यासाठी हमी भाव 4 हजार  व बोनस 4 हजार असे एकूण 8 हजार प्रति क्विटल दर मागील दोन वर्षांपासून महाबीज शेतकऱ्यांना देत आहे.  ज्युट पिकाचे कोणतेही पाळीवप्राणी, वन्यप्राणी, पशु, पक्षी नुकसान करत नाही. ज्यूट पिकाचे चांगले नियोजन करून 5 ते 6 क्विंटल पर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांनी मिळू शकते तसेच ज्यूट पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो. यांत्रिक पद्धतीने सुध्दा मळणी करता येते.

सीड प्लॉटची नोंदणी  शंभर रुपये  प्रति एकर भरुन करण्यात येत असून नोंदणीची अंतिम तारीख 10 मे 2023 अशी आहे. नोंदणीसाठी श्रीमती अनिता ठाकरे (8669642726/ 888319957) यांचेशी संपर्क साधून शेतकरी नोंदणी करु शकतात. तरी ज्यूट, उडिद, मुग, सोयाबीन, तीळ, तुर, नागली इत्यादी पिकांचे सीड प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात  शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन नंदुरबार महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. कोटकर, यांनी केले आहे.