नंदुरबार (जिमाका वृत्त) : पाणी हे अत्यावश्यक बाब आहे. दुर्गम भागात मैलोमैल चालून घरातल्या माता, भगीनी, मुली पाणी आणतात, हे विदारक सत्य पुढच्या पिढ्यांसाठी बदलायचे असेल तर ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे ‘शिल्पकार’ बना, अशी भावनिक साद  राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी घातली आहे. 

ते जलजीवन मिशन च्या कामांसंदर्भात नंदुरबार तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंचांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार, प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार पं.स. गटविकास अधिकारी जयवंत उगले, नंदुरबार तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले, ही योजना मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर भविष्यकालिन नियोजनावर अधारित अशी एखादी पाणी योजना यायला 30 वर्षे वाट पहावी लागेल. भविष्यातील 30 वर्षे वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या दूरदृष्टिकोणातून ही पाणी योजना पेयजल व दैनंदिन वापरासाठी बनविण्यात आली आहे. दर मानसी लागणाऱ्या पाण्याचेही सुक्ष्म नियोजन यात आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जलजीवन मिशन च्या कामात भरीव प्रगती दिसणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वेळेवेळी भेटी द्याव्यात. कामकाजात कुचराई/हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी आजच नोटीस देण्यात याव्यात. एकही गाव, वस्ती, पाडा आणि नागरिक वंचित राहणार नाही, यासाठी नियोजनासोबतच समन्वय राखावा, असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले आहेत. 

योजना परिपूर्ण होण्यासाठी त्रुटींचे निराकरण करा

डॉ. हिना गावित

जलजीवन मिशन च्या कामात काही त्रुटी असल्यास गावातील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक यांनी वेळीच निदर्शनास आणून दिल्यास त्याचे निराकरण करून योजना परिपूर्ण होण्यासाठी मदत होईल. तसेच या योजनेच्या नियोजनात परिसरातील शाळा, आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र सार्वजनिक कार्यालये यांना लागणाऱ्या पाण्याचेही नियोजन करावे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले. 

लक्षणीय…

💧जलजीवन मिशनच्या कामांसाठी प्रथमच संरपंच व ग्रामसेवकांशी थेट संवाद

💧जलजीवन मिशन ची कामे 2024 पर्यंत पूर्ण करावित.

💧 कामात कुचराई करणारे अधिकारी व वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार.

💧 नियोजनासोबत समन्वयाचीही गरज.

💧 योजनेतील त्रुटी ग्रामस्थ, सरपंच व ग्रामसेवकांनी सांगितल्यास योजना परिपूर्ण करण्यासाठी तात्काळ निराकरण करणार.

💧 शाळा, आश्रमशाळा, आरोग्य केंद्र व सार्वजनिक कार्यालयांचाही असेल योजनेच्या नियोजनात समावेश.