नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा संगळीकडे उपलब्ध नसल्याने ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अक्राणी व अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील 1 ते 4 थीचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

            शाळा सुरु करतांना  कोविड 19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या तालुका मुख्यालयाच्या गावात कोविड-19 चे रुग्ण असल्याने या ठिकाणी इयत्ता 1 ते 4 थीच्या शाळा बंद राहतील. तसेच या मुख्यालयाच्या ठिकाणाहून विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शाळेत जात असतील तर ग्रामीण भागातील अशा शाळादेखील बंद राहतील.

            इयत्ता 1 ली ते 4 थीचे वर्ग सुरु करतांना आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत. ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकासमवेत बैठक आयोजित करुन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कोविड 19 संदर्भातील आव्हाने व भूमिका बाबात माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर, साबण, मास्क उपलब्ध करुन देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीचे सहाय्य घेण्यात यावे. यासाठी वेळोवेळी विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करावे, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

            आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्यासंदर्भात संबंधित विभागांनी पालकांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घ्यावा. सद्यस्थितीत या शाळांतील विद्यार्थी नजिकच्या सुरु असलेल्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकतील. त्यासाठी प्रस्तुत शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांची यादी नजीकच्या ज्या शाळेत हे विद्याथी जाऊ इच्छीत असतील अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना घ्यावी. एखाद्या गावात कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्यास सदर गावातील शाळा 5 दिवस बंद ठेवण्यात यावी आणि आणखी रुग्ण आढळून न आल्यास ती परत सुरु करावी.

            शाळा सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे.  वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे पालन करुन करावी. वर्गामध्ये  एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.

            शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर करण्यासंदर्भात सूचना प्रदर्शित करावे, थुंकण्यावरील बंदीचे काटेकोरपणे पालन करावे, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फुटाचे अंतर राखले जाईल अशी विशिष्ट चिन्हे, वर्तुळ काढण्यात यावीत. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होऊ शकते. अशा कार्यक्रमांच्या आयेाजनावर निर्बंध असेल. शिक्षक पालक यांच्या बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी.

            विद्यार्थी,पालक शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने वैयक्तिक स्वच्छता व कोविड-19 प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छता विषयक सवयी व कोरोना संदर्भातील गैरसमजुती विषयक जनजागृती करावी.

            विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून  असेल, पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावीत, शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

            तसेच आदेशात नमुद सर्व आवश्यक सुचनाचे काटेकारेपणे पालन करण्यात यावे व स्थानिक परिस्थिती नुसार आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.