नंदुरबार (प्रतिनिधी):- शाळाबाह्य बालके शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर सर्वेक्षण सुरू असून, या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सहभागी होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात जनप्रबोधन करण्याची विनंती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून करण्यात आली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची शोध मोहीम दिनांक 1 ते 10 मार्च 2021 या दरम्यान सुरू आहे. सदर शोध मोहीम ही जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असून, यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेचा सहभाग आहे. याबाबत व्यापक जनप्रबोधन होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनीदेखील आवाहन केले आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबारच्या समता विभाग विभागामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातुन याबाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या शोधमोहीमेबाबत व्यापक जनप्रबोधन होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, स्वयंसेवी संस्था, स्थानिक कलाकार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शोध मोहिमेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने सर्व जनतेस व संबंधित घटकांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरणात्मक आवाहन करावे व शाळाबाह्य बालके शोध मोहिमेत सहभागी व्हावे, अशी विनंती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबारचे प्राचार्य श्री. जे. ओ. भटकर यांनी केली आहे. या माध्यमातून शोध मोहिमेबाबत व्यापक जनप्रबोधन होऊन सर्व बालकांना मोफ़त व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देता येईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.