नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित, दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला. अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे श्री भूषण कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे संचालन केले. साध्या आणि सोप्या भाषेतील त्यांच्या संवादाने कार्यशाळेतील सहभागी शिक्षक मंत्रमुग्ध झाले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे दिनांक ७ व ८ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसात दिक्षा ई-कंटेंट निर्मिती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी विशेष आमंत्रित प्रशिक्षक म्हणून अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेचे संचालक श्री. भूषण कुलकर्णी हे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत ए. आय. (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) चा वापर करुन डिजिटल लेसन प्लान व ट्रान्सस्क्रिप्टची निर्मिती, लॅपटॉप व पेन टॅब लो बजेट इंटरॅक्टिव यंत्रणा, गणित, विज्ञान, शिष्यवृत्ती यासारखे विषय शिकवण्यासाठी इंटरॅक्टिव यंत्रणेचा वापर, दर्जेदार पॉवर पॉइंट निर्मितीच्या महत्वाच्या टिप्स, कॅमेरासमोरील प्रभावी सादरीकरण, क्वालिटी व्हिडिओ शूट तंत्र, कॅमेरा + पॉवर पॉइंट (इंटरॅक्टिव) लाईव्ह मिक्सिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ निर्मितीसाठी क्रोमा आणि टेलिप्रॉम्प्टरचा वापर, व्हिडिओ एडिटिंग अश्या विविध विषयांवर सविस्तर प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले.
कार्यशाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मर्यादित शिक्षकांना प्रवेश तसेच कार्यशाळा ऐच्छिक स्वरुपाची म्हणजेच ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, अश्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येऊन प्रथम नोंदणी केलेल्या ८० शिक्षकांना कार्यशाळेसाठी लॅपटॉप घेऊन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी विभागप्रमुख अधिव्याख्याता श्री विनोद लवांडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री प्रवीण अहिरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांच्यासह शिक्षण विभागाचे या कार्यशाळेसाठी सहकार्य लाभले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. श्री बाबासाहेब बडे, श्री प्रदीप पाटील, श्री सुभाष वसावे, विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सहभागी शिक्षकांनी नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल आभार व्यक्त करून; जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठी पुन्हा अश्याच प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्याची व सर्वांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. कार्यशाळेला श्री गोविंद वाडीले व श्री विशाल पाटील या शिक्षकांनी प्रशिक्षण सहायक म्हणून काम पाहिले. सुत्रसंचलन श्री देवेंद्र बोरसे यांनी केले.