नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगांराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योग,कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्याच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना  रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यात विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत आहेत. आतापर्यंत एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स, हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा, सीआय ई ऑटोमोटिव्ह, फियाट इंडिया, आरएसबी ट्रान्समिशन, ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस या सारख्या नामांकित उद्योजक कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे.

सर्वसाधारण नववी उत्तीर्णपासून पुढे किंवा दहावी व बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह जिल्ह्यातील सर्व आस्थापना-उद्योजकांनी त्यांच्याकडे असलेली रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर अधिसूचित करुन या रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवावा. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांकावर (02564-295805) कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.