नंदुरबार (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र  योजना  सुरु असून या योजनेत पात्र व्यक्ती, संस्थांनी मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मध केंद्र योजनेत  मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.  उत्पादित केलेले मध शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्यात येते.   वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेणेसाठी अर्जदार साक्षर असावा. त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे पात्रता धारकास अनिवार्य असेल.

केंद्र चालक प्रगतशील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी  अर्जदार किमान 10 वी पास असावा, वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा भाडे तत्वावर 1 एकर शेतजमीन असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

विशेष प्रशिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृद्ध अशी  कोणतीही व्यक्ती रुपये 25/- प्रवेश फी भरुन पाच दिवस प्रशिक्षण घेऊ शकतील.

या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं 222, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210053 यावर किंवा वसंत गावीत मोबाईल क्र. 9145691051 यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. चाटी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.