नंदुरबार शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्यास कडक कारवाई करावी आणि पोलीसांचे एक फिरते पथक स्थापन करून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आवश्यक उपययोजना कराव्यात. नागरिकांना कोरोनाविषयक नियमांची माहिती देण्यासाठी शहरात दोन ध्वनीक्षेपक असलेली वाहने सतत फिरती ठेवावीत. नव्याने कोरोना बाधित आढळणाऱ्या परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी शहरात 4 फिरते पथक स्थापन करावे. प्रत्येक पथकाने दररोज किमान 100 स्वॅब घ्यावेत. पथकात पोलीस, आरोग्य आणि नगरपालिकेच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश करावा.
मंगलकार्यालयात नियमांचे पालन व्हावे यासाठी नेमलेल्या पथकाने वेळोवेळी भेटी द्याव्यात. भाजीपाला विक्रेते, दुकानदार, मेन्स पार्लर चालक, गर्दीच्या ठिकाणचे व्यायसायिक यांची कोरोना चाचणी करावी. कोरोना चाचणी केवळ शासकीय यंत्रणेमार्फत होईल याची दक्षता घ्यावी. कोरोना नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू करण्यात यावे.
खाजगी रुग्णालयांशी समन्वय ठेवून लक्षणे असलेल्या व्यक्ती आढळल्यास त्वरीत चाचणी करावी. रुग्णांच्या वाहतूकीसाठी आरोग्य विभागाकडे नव्याने आलेल्या रुग्णवाहिकांचा उपयोग करावा. रुग्ण बरा झाल्यावर रुग्णालयातून सोडण्यापूर्वी निश्चित कालावधीसाठी गृह विलगीकरणात राहण्याबाबत हमीपत्र लिहून घ्यावे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी संबधितांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.