नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचेमार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

एचआयव्ही जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील युवक युवतींसाठी एचआयव्ही/एड्स कोरोना, सोशल डिस्टसिंग या विषयावर पोस्टर स्पर्धा, कागदापासून किंवा कापडापासून मास्क तयार करणे, जिआयएफ मीमस् र्स्धा व सेल्फी विथ स्लोगन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती, मातेकडून बालकास एचआयव्ही एड्स  संसर्गापासून प्रतिबंध, स्वताचे एचआयव्ही स्टेटस जाणून घ्या, जागतिक एकता व सामायीक जबाबदारी आदि विषयांवर ऑनलाईन व्हीडीओ तयार करणे व वक्तृत्व स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले.

सर्व स्पर्धेतील विजेत्यांना पारीतोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.  विवाहपूर्व एचआयव्ही-एड्स्‍ ऐच्छिक तपासणीसाठी प्रोत्साहन देणे  ही काळाची गरज असून आपण आपल्या नजिकच्या सरकारी रुग्णालयात एचआयव्ही तपासणी उपचार मोफत करू शकतात. ही तपासणी गोपनीय आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन  क्रमांक 1097 वर संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. भोये यांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी. सातपुते, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सुर्यवंशी, एआरटी विभागाचे डॉ. प्रितम पाडवी, डॉ. राजेश केसवानी आदिंनी परिश्रम घेतले.