नंदुरबार – नवापूरमध्ये दुसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी  पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाययोजनांबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना सविस्तर माहिती द्यावी आणि पोल्ट्री फार्ममध्ये मार्गदर्शक सुचनेननुसार उपाययोजना होत असल्याची खात्री करावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.

नवापूर येथे बर्ड फ्लूबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस.राऊतमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील,   तहसीलदार उल्हास देवरे, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.सिंह म्हणाले, भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात. बाधित क्षेत्रातील अन्य पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी त्वरीत पाठवावे. नमुने पॉझिटीव्ह आल्यास बाधित क्षेता्रची नव्याने आखणी करण्यात यावी. जैव सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र पथक पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कुक्कुट पक्षी, अंडी आदींचे सर्वेक्षण झाल्यावर नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

श्री.सिंह यांनी पोल्ट्रीमधील कुक्कुट पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याच्या कामाची पाहणी केली. विल्हेवाट लावताना सर्व मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन करावे आणि अधिकाऱ्यांनी सदर प्रक्रीयेकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी पोल्ट्री व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बर्ड फ्लूबाबत परिसरात गैरसमज पसरू नये याबाबत दक्षता घ्यावी. रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक सतर्कता बाळगावी. पोल्ट्रीमध्ये कुक्कुट पक्ष्यांची मरतूक आढल्यास तेथील नमुने त्वरीत प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावे. कत्तल कामी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र पथक नेमावे, असे निर्देश त्यांनी दिले. नगरपालिका हद्दीत दवंडी देऊन खबरदारीविषयक नागरिकांना माहिती द्यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महेश सुधाळकर , जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, उप शिक्षणाधिकारी युनुस पठाण  आणि पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

नवापूर येथे निगराणी  क्षेत्रातील  एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये 10 लाख 4 हजार 140 पक्ष्यांची गणना झाली असून त्यापैकी 32 हजार 791 मरतूक आढळले आहे. यापैकी बाधित क्षेत्रात 16 पोल्ट्रीमधील 4 लाख 90 हजार 485 कुक्कुट पक्षी आहेत. पहिल्या टप्प्यात नमुने पॉझिटीव्ह आलेल्या 4 पोल्ट्री फार्ममधील साधारण 1 लाख 26 हजार पक्ष्यांच्या कत्तलीचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत सकाळी सुरू करण्यात आले. सायंकाळपर्यंत 30 हजार पक्ष्यांची शास्त्राक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कत्तल करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी व पोर्ल्टी फार्मच्या ठिकाणी आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.