आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढविणे आणि तृणधान्य उत्पादनात अधिकाधिक वाढविणे, यासाठी प्रोत्साहन देणे, ही उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य यावर्षानिमित्त ठेवण्यात आली आहेत. ज्वारी धान्याची पौष्टिकता इतर तृणधान्यांच्या मानाने कशी चांगली आरोग्यवर्धक आहे. या विषयी थोडक्यात माहिती.

            ज्वारीचे पोषणमुल्ये (प्रति 100 ग्रॅम ) उर्जा- 349 कि. कॅलरी, प्रथिने 11.6 टक्के, स्निग्ध पदार्थ 1.90, पिष्टमय पदार्थ- 72.60 टक्के, तंतुमय पदार्थ 1.60, फॉस्फरस- 222 मि.ग्रॅम, लोह सरासरी 4.10 मि. ग्रॅम कॅल्शियम-25 मि. ग्रॅम, व्हिटामिन बी 6-20 टक्के आहेत.

ज्वारीचे आहारातील महत्व

ज्वारी थंड, गोड, रक्तविकारहारक, पित्तशामक, रूक्ष असून कफ व वायुकारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक असून मूळव्याध, अरुची, व्रण पडणे यावर उपयोगी असते. लाल ज्वारी पौष्टिक, थंड, गोड, बलदायी, त्रिदोषहारक मात्र किंचीत कफकारक आहे. ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ कमी होतो. ज्वारीमध्ये मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. महिला वर्गामधील मासिकपाळी आणि गर्भाशयाच्या समस्यांवरही ज्वारी उपायकारक ठरते.

ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ राहते. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे फायद्याचे असते. लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे अॅनिमिया सारखा आजार असणाऱ्यांनी ज्वारीचे पदार्थ खाल्यास चांगला फायदा होईल. सध्याच्या राहणीमानामुळे लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढले आहे आणि लठ्ठपणा म्हणजे आजारांना निमंत्रण. आहारात भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा, चरबी नियंत्रणात येण्यास मदत हाईल.

ज्वारी रक्तवाहिन्यातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासही मदत करते. मुतखडाचा त्रास असलेल्या व्यक्तिने ज्वारीची भाकरी व इतर पदार्थ खाल्ल्यास फायदा होतो. विविध रोगांना बळी पडण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होते.ज्वारी ही ग्लुटेनमुक्त असल्याने प्रमुख खाद्यान्न म्हणून उपयोगी आहे. अशा बहूगुणी ज्वारीचे सेवन आपल्या दररोजच्या आहारामध्ये एकवेळी केल्यास आपले आरोग्य चांगले ठेवण्यास निश्चित उपयोग होईल.