नंदुरबार : दिनांक 5 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्त) :

जिल्हा प्रशासन संभाव्य टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर सतर्क असून शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकासान टाळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपवर पीक-पेरा ची नोंदणी करण्याचे आवाहन करतानाच संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट-भेट देवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. 

त्यांनी आज नंदुरबार तालुक्यातील रनाळे, घोटाणे, न्याहली आणि खोक्राळे गावातील शेतकऱ्यांची थेट शाताच्या बांधावर जाऊन भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या यावेळी परिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषि अधिकारी सी. के.ठाकरे, नंदुरबारचे तहसीलदार नितीन गर्जे तसेच कृषि व महसूल विभागाचे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्रीमती खत्री म्हणाल्या, जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांपैकी 12 महसूली मंडळात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. तसेच 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकं करपली आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच भागात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केले असून पिकांचे नुकसान होत असले तरी अशा  नुकसान झालेल्या बाजरी व त्यासारख्या पिकांतून चाऱ्याची तरतूद करता येण्याच्या शक्यतेवरही प्रशासकीय पातळींवर विचार सुरू आहे. 

जिल्ह्यातील 70 टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला असून या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ होण्यासाठी त्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकाची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीतून हमखास भरपाई मिळण्यास मदत होईल.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी रनाळे शिवारातून भिकूबाई भिल, विजय कोकणे, सुभाष बावा तर घोटाणे शिवारातील संदिप बावा, सुखदेव पाटील, भैय्या धनगर या शेतकऱ्यांशी थेट शेतात संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक वस्तुस्थिती व अडचणी ऐकून घेतल्या. तसेच येणाऱ्या काळात टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सतर्क असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपोययोजना करण्यावर आपला भर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.