नंदुरबार (जिमाका वृत्त) : पशुपालकांनी मागील वर्षी लसीकरण न केलेले गाय वर्गातील सर्व निरोगी पशुंना व नवीन जन्माला आलेल्या लहान वासरांना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकिय संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील काही ठिकाणच्या जनावरांमध्ये लंपी स्कीन या साथरोग सारखी लक्षणे आढळून येत असून रोग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवु नये यासाठी जिल्ह्यातील पशुंचे लसीकरण करण्यात येणार आहे.  पशुपालकांनी आपल्या पशुची लसीकरण करुन घ्यावे व लम्पी चर्मरोगग्रस्त जनावरांची योग्य शश्रुषा करुन मरतुक अवस्था टाळण्यासाठी तसेच आजारी पशुधनावर त्वरीत उपचार करुन लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांनी प्रत्यक्ष जनावरांमध्ये सदर रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदु पासून 5 कि.मी. त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरूपात लसीकरणास सुरुवात करावी.

नंदुरबार जिल्ह्यातील पशूंना रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी पहिल्या टप्यात 1 लाख 52 हजार 100 व दुसऱ्या टप्यात 1 लाख 52 हजार 200 असे एकूण 3 लाख 4 हजार 300 लसमात्रा प्राप्त झाल्या असून या लसींचे क्षेत्रीय पशुवैद्यकिय संस्थाना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाय वर्गातील पशुधनाच्या संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आजपावेतो गायी 97059, बैल- 108346 व लहान वासरे 19007 असे एकूण 224412 गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.

बाधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना

लंपी स्किन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे.

◼️ आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु गटातील कॅप्री पॉक्स या प्रवर्गात मोडतात, या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात.

◼️ या रोगाचा प्रसार डास, गोमाशा, गोचिड इ. बाह्य कीटकांद्वारे बाधित जनावरांच्या त्वचेवरील व्रण व नाकातील स्त्राव, दुध, लाळ, विर्य इ. माध्यमांमार्फत संसर्ग असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे होऊ शकतो त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

◼️ सदर रोगाची लागण पशुपासून मानवांना होत नसल्याने पशुपालकांनी घाबरू नये.

◼️रोगग्रस्त पशुपासून उत्पादीत होणारे दूध व त्यापासून बनणारे पदार्थ मानवी आहारास हानीकारक नाहीत.

◼️ निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.

◼️ गाई म्हशी एकत्र बांधल्या जात असल्यास, म्हशींना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी.

◼️ त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात आणू नये.

◼️बाधीत गावांमध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चराई करता स्वतंत्र व्यवस्था करावी.

◼️ साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा निरोगी भागात प्रवेश टाळावा तसेच गोठ्यास त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.

◼️प्रादुर्भावग्रस्त भागातील जनावरांची व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालीवर बंधन आणणे तसेच प्रादुर्भावग्रस्त भागातील 10 कि.मी. परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशु प्रदर्शने इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयास त्वरीत कळविण्यात यावे.

◼️बाधित परिसरात स्वच्छता करावी व आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, पोटेंशिअम परमँगनेट व्दारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

◼️या रोगाने ग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फुट खोल खड्यात गाडून विल्हेवाट लावावी तसेच मृतदेहाच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

◼️बाधित गावांमध्ये तसेच बाधित गावापासून 8 कि.मी. त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना रोगग्रस्त जनावरे वगळता इतरांना लसीकरण करण्यात यावे.

◼️या रोगाचा प्रसार डास, गोमाशा, गोचिड इ. बाह्यकिटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करण्यात यावी. 
◼️या रोगाने ग्रस्त झालेल्या पशुचे योग्य औषधोपचार वेळोवेळी करण्यात यावे, आजारी जनावर आढळल्यास 1962 या टोल फ्री क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.