नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पद्धतीने करावे आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

            कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

            नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

            नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व  नूतन वर्ष सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

नूतन वर्ष स्वागत  शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.