नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जलद व विना अडचण कर्जे मिळण्याची खात्री देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच किंवा  मोबाईल ॲप्सना व्यक्ती, छोटे उद्योजक वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने सावधानतेचा इशारा दिला आहे.

या ॲपद्वारे कर्जदारांकडून अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागविण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहे.

आरबीआयकडे नोंदणी केलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतूदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात.

नागरिकांनी बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्थांचा खरेपणा आणि पूर्वइतिहास पडताळून पाहावा. याशिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन  न केलेल्या अनाधिकृत ॲपवर कधीही शेअर करु नये. असे ॲप्स आणि ॲप्सशी संबंधित बँक खात्यांची माहिती संबधित कायदा  अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी https://sachet.rbi.org.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा.

बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या ग्राहकांना बँकाची किंवा एनबीएफसींची नावे सुरुवातीलाच सांगावीत असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसींचीं नावे व पत्ते तसेच आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुद्धच्या तक्रारी दाखल करण्यासाठी https://cms.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले आहे.