नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  दुर्गम भागातून होणारे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी कुक्कुट पालन, मत्स्यपालन, शेळीपालन अशा व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड.पाडवी यांनी मानव विकास मिशनच्या विकास कामाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, मानव विकास मिशनचे नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागात अशा व्यवसायांना चालना देण्यासाठी  आवश्यक प्रस्ताव तयार करावा. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी मार्केटींगची सुविधा निर्माण करावी लागेल. त्यादृष्टीने  शहराच्या ठिकाणी शितगृह उभारणीसाठी नियोजन करावे. स्थानिकासोबत बाहेरील राज्यातील बाजारात मासे पाठविण्यासाठी अशा सुविधा आवश्यक आहेत.

चांगले काम करणाऱ्या बचत गटांना प्रोत्साहन देण्यात यावे. स्थानिक स्तरावर होणाऱ्या भगर सारख्या उत्पादनावर प्रक्रीया व  त्याचे योग्य ब्रँडींग करून विक्री करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. तयार कपडे निर्मितीच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या महिलांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक  वसाहतीत महिलांचे एकत्रित युनिट उभारण्याच्या शक्यतेची पडताळणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

मानव विकास मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी माहिती दिली.