नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते.

शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम मोहिमस्तरावर पूर्ण करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्याच्या कामाचे योग्य नियोजन करावे. आदिवासी बांधवांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करावा, असे ‍निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले. लॉकडाऊन काळात 58 हजार नागरिकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत नव्याने समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            अंत्योदय योजनेअंतर्गत 98.23 तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 100 टक्के लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 57 रास्त भाव दुकानांवर कारवाई करण्यात आली, त्यातील 6 दुकाने रद्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.