नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोरांबा, ता. अक्कलकुवा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या हस्ते 70 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व 100 विद्यार्थ्यांना आधार कार्ड दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.घोष म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत जातीचे दाखले व आधार कार्ड दुरुस्तीचा लाभ तळोदा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांना मिळणार आहे. यामुळे दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच आधारकार्ड दुरुस्तीसाठी शहरात येण्याची आवश्यकता असणार नाही. त्यांना हे दाखले त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत थेट वाटप करण्यात येईल. जात प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड दुरुस्तीवर येणारा खर्च आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या सुविधेचा आश्रमशाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापक एस. आर. चौधरी, अधीक्षक मनोज कुरकुरे, एस. वाय नरवाडे, पी. पी. महाजन, बायजा पाडवी, सुरज पावरा, मनीष पाडवी, बिरबल वसावे, विजेसिंग वसावे, जयसिंग वसावे, कांतीलाल वसावे, मदन हळदे, सेतू चालक वाल्मीक पाटील, शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.