नंदुरबार (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक व त्यांचे वारस असलेल्या वीरपत्नी, विधवा, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात पुरस्कार प्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य या क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, देशात राज्यात प्रतिष्ठा  वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस, अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांचे पाल्य, शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 10 वी, 12 मध्ये 90 टक्के  पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यापिठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक, पत्नी, पाल्य यासाठी पात्र असतील. पात्र इच्छुकांच्या नावांची यादी, केलेल्या उत्कृष्ट कार्याच्या माहितीसह अंतिम निवडीसाठी पुण्यातील सैनिक कल्याण विभाग यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

अतिंम निवड झालेल्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीयस्तरावर रुपये 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपये 25 हजार रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सर्व संबंधितांनी आपले प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे यांच्याकडे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही श्री पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.