नंदुरबार (जिमाका वृत्त) :जिल्ह्यात जनावरांमधील लंपी या त्वचेच्या साथरोगाचा प्रसार सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गोवर्गिय जनावरांची खरेदी,विक्री, वाहतुक, जत्रा, प्रदर्शने व बाजारपेठ बंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ.दे. पाटील यांनी  शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

लंपी संसर्गाच्या केंद्रापासून किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लंपी चर्मरोगाने बाधित गोवर्गीय पशुधन आढळून आले असून  त्यात नंदुरबार 95, नवापूर 1, शहादा 44, तळोदा 26, अक्कलकुवा 72, धडगांव 27 असे जिल्ह्यात एकूण 265 बाधित पशुधन आढळले आहेत.  

बाधित पशुधनापैकी 83 पशुरुग्ण औषधोपचाराने बरी झाले असून एकूण 11 पशु मृत झाले आहेत. सद्यस्थितीत 171 पशुरुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ.दे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.