नंदुरबार ( प्रतिनिधी) :- केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील केंद्रीय शिक्षण बोर्डामार्फत आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी पार पडलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 181 शाळातील 5 हजार 793 विद्यार्थ्यांनी (90.92 %) उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात पार पडलेल्या या सर्वेक्षणाबाबत केंद्रस्तरावरून आलेल्या निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.
केंद्र शासनामार्फत दर तीन वर्षांनी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीचे आयोजन केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील 181 शाळांची निवड करण्यात आली होती. संपूर्ण जिल्ह्यातील 181 शाळांमधून इयत्ता तिसरीचे 885 विद्यार्थी, इयत्ता पाचवीचे 905 विद्यार्थी, इयत्ता आठवीचे 1 हजार 750 विद्यार्थी व इयत्ता दहावीचे 2 हजार 253 विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे तसेच
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेसाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवड झालेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे, डॉ. युनूस पठाण, आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारचे सहायक प्रकल्प अधिकारी श्री नंदू साबळे व तळोदा येथील सहायक प्रकल्प अधिकारी श्री चौधरी , शिक्षणशास्त्र व समाजकार्य महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांनी ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
या चाचणीच्या कार्यप्रणालीच्या निरीक्षक म्हणून खास दिल्लीहून आलेल्या श्रीमती मोनिका अरोरा व श्रीमती स्मृती श्रीवास्तव यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री महेश पाटील व जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
या सर्वेक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्हा समन्वयक डॉ राजेंद्र महाजन, जिल्हा संपर्क प्रमुख श्री अंबालाल पाटील व सहसमन्वयक श्री उदय केदार यांनी परिश्रम घेतले. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर तालुका नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मुख्याध्यापक सभा घेऊन त्यात मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्ह्यातील शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी संपर्क सत्र राबविले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण, श्री रमेश चौधरी, अधिव्याख्यात्या डॉ. वनमाला पवार, डॉ. संदीप मुळे, श्री पंढरीनाथ जाधव, श्री सुभाष वसावे यांच्यासह विषय सहायक श्री प्रकाश भामरे, श्रीमती अलका पाटील, श्री देवेंद्र बोरसे व सर्व विषय तज्ञ यांनी यात मोलाची कामगिरी बजावली.
सर्वप्रथम निवडलेल्या शाळेत एकापेक्षा अधिक तुकड्या असल्यास त्यापैकी ड्रॉ पद्धतीने एका तुकडीची चाचणीसाठी निवड करण्यात आली. चाचणीसाठी निवड केलेल्या तुकडीत 30 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्यातूनही रॅन्डम पद्धतीने तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडे दहा ते बारा या कालावधीत आणि आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी साडे दहा ते साडे बारा या कालावधीत लेखी चाचणी घेऊन त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची तोंडी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील 181 शाळांसाठी 181 निरीक्षक 292 क्षेत्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहायक यांच्यासोबतच जिल्ह्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांतील शिक्षक, आश्रमशाळांतील शिक्षक, बीएड व समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी अशांची यासाठी क्षेत्रीय अनवेशक म्हणून निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांतील शिक्षकांनी यात निरीक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
संपूर्ण जिल्ह्यात या सर्वेक्षणासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी कोरोना चे सावट आणि दिवाळी सुट्या अश्या कालावधीतदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्वेक्षण यशस्वी केल्याने सर्वच अधिकाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.