नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा परिषद शाळांना दिवाळी सुट्टी तीन दिवसांनी वाढवण्यात आली असून, शासनाच्या परिपत्रकानुसार आता ही सुट्टी दिनांक 28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत गणली जाईल.
नंदुरबार जिल्हा परिषदेने शाळांना दिल्या जाणाऱ्या दिवाळीच्या 17 दिवस सुट्यांऐवजी 14 दिवस सुट्या जाहिर केल्या होत्या. याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे तसेच शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांची भेट घेऊन सुट्या कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सुटी कालावधी वाढवून देण्यासाठी पत्रक काढले आहे. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिवाळी सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांना दि. २८ ऑक्टोबर ते दिनांक १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या सुटया घोषित करण्यात आल्या होत्या. तथापि शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांनी कमी झालेल्या दिवाळी सुटयाबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिवाळी सुटया दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर ऐवजी दिनांक २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत देण्यात येत आहेत . दिनांक १५ नोव्हेंबरपासून सर्व प्राथमिक शाळा नियमितपणे सुरु होतील . ज्या प्राथमिक शाळांमध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी NAS चाचणी आयोजित केलेली आहे, त्या शाळांना दिनांक १५ व १६ नोव्हेंबर , २०२१ या दोन दिवसांची विशेष सुटी जाहिर करण्यात येत आहे . दिनांक १७ नोव्हेंबरपासून या शाळा नियमितपणे सुरु होतील . दिवाळी सुटी अंतर्गत कमी झालेल्या उर्वरित सुटया नाताळ व होळी या दोन सणांना जोडून जाहिर करण्यात येतील . दिनांक १९ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सर्व प्राथमिक शाळांना सुटी असेल , असेही या पत्रकात म्हटले आहे.