नंदुरबार   राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात 24 हजार 771 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून 24 दहजार 671 शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या  खात्यात 186 कोटी 46 लक्ष वितरीत करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती  योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली होती. पालकमंत्री ॲड.के.सी .पाडवी यांनी  प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमुक्तीची प्रक्रीया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा आणि सहकार विभागाने परस्पर समन्वयाच्या माध्यमातून आधार प्रमाणिकारणाचे चांगले नियोजन करण्यात आले. आधार प्रमाणिकरणातील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना सूचनास दिल्या.

सहकार विभागामार्फत ग्रामीण भागात 5 पथके तयार करून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्यात आले. या पथकांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहितीदेखील पोहोचवली. काही शेतकऱ्यांच्या हंगामी स्थलांतरामुळे येणाऱ्या अडचणीतूनही या पथकांनी मार्ग काढत अधिकाधीक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले.

नंदुरबार तालुक्यात 9418, नवापूर 3364, तळोदा 1746, अक्कलकुवा 2179, शहादा 7117 आणि अक्राणी 947 अशा एकूण 24 हजार 771 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरीत करण्याचे कामदेखील तात्काळ करण्यात येत आहे.

नंदुरबार तालुक्यात 9375 शेतकऱ्यांच्या खात्यात 71 कोटी 30  लक्ष, नवापूर 3358 शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी 1 लक्ष, तळोदा 1722 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 36 लक्ष, अक्कलकुवा 2171 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 8 लक्ष, शहादा 7104 शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी 8 लक्ष आणि अक्राणी 944 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 63 लक्ष असे एकूण 24 हजार 671 शेतकऱ्यांच्या खात्यात 186 कोटी 46 लक्ष रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांच्या  खात्यातही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात केवळ 398 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले असून त्यासाठी मोहिम स्तरावर सहकार विभागाच्या पथकामार्फत काम सुरू आहे. लवकरच सर्व पात्र  लाभार्थी कर्जमुक्त होऊन नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतील, अशी माहिती सहकार उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.