नंदुरबार जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील 319 गावे आतापर्यंत तंटामुक्त झालेली आहेत. उर्वरित गावांनीही या मोहिमेत सहभागी होवून गाव तंटामुक्त करावे. त्यासाठी प्रशासनाने या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी येथे दिल्या.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, प्रभारी पोलिस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्यासह तंटामुक्त गाव मोहिम समितीचे सदस्य उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले, गावपातळीवर लहान- लहान कारणांवरून होणाऱ्या वादाचे पर्यावसन मोठ्या वादात होवू न देता गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी आणि गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. या मोहिमेची सर्वत्र प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत अस्तित्वातील तंटे मिटविण्याबरोबरच नव्याने निर्माण झालेले वाद, तंटे मिटविण्याची जबाबदारी देखील तंटामुक्त गाव समितीवर आहे. एवढेच नव्हे, तर गावात तंटे निर्माण होवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीने कराव्यात. गाव पातळीवरील समित्या कार्यरत करून या मोहिमेच्या माध्यमातून गावा-गावातून तंटे हद्दपार करावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी पोलिस अधीक्षक श्री. पवार यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील 12 पोलीस स्टेशन अतंर्गत 984 गावे व 595 ग्रामपंचायती येतात. यापैकी आतापर्यंत 319 गावे तंटामुक्त झाली असून अद्याप 276 गावे बाकी आहेत. या गावांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच ही मोहीम गाव पातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस दलातर्फे सर्वंकष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळेस पोलीस अधिकारी आणि समिती सदस्यांनी महत्वपूर्ण सुचना केल्यात.