नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृष्णा राठोड, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, प्रकाश थविल या महोत्सवाचे समन्वयक तथा जिल्हा पुनवर्सन अधिकारी (ससप्र) नितीन सदगीर, आदी उपस्थित होते.

????????????????????????????????????

             जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे यंदा पूर्ण होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी करावी. हा उपक्रम राबविताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन होईल याकडेही लक्ष द्यावे.

             स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हास्तरावर सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात यावे. नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन करावे. स्वांतत्र्यदिनी जिल्हास्तरावरुन मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडण्यात यावे. जिल्ह्यातील अनामवीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या कार्याची माहिती रस्त्यांच्या कडेला लावण्यात यावीत. स्वातंत्र्यकालिन माहिती, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती संकलित करावी. स्वातंत्र्यदिनी प्रभातफेरीचे आयोजन करावे. या फेरीत सर्वांना सहभागी करून घेण्यात यावेत.

             जिल्ह्याच्या मुख्यालयी 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येईल. याशिवाय स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांचे संचलन करावे. शालेय, महाविद्यालयस्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेण्यात याव्यात. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येईल. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात यावा. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील विद्यापीठस्तरावर  कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा, जाणीव जागृती इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. स्वराज्य महोत्सवानिमित्त शासकीय इमारतींवर आजादी का अमृत महोत्सवी लोगो तसेच संविधानस्तंभाची उभारणी, जिल्ह्याच्या मुख्यालयी शासनमान्य लामण दिवा लावण्यात यावेत. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसास्थळांच्या स्वच्छतेसाठी मोहीम करण्यात यावी.

              तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण मोहीम, तालुक्यातील पुरातत्व महत्वाच्या वारसा स्थळाची देखभाल करण्यासाठी ऐतिहासिक वारसा जपवणूक करणाऱ्या संस्थाना दत्तक देण्यात यावी. तालुक्याच्या  मुख्यालयी 75 फुट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. शालेय, महाविद्यालयास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. तालुक्यातील शासकीय इमारतीवर आजादी का अमृत महोत्सवी लोगो तसेच संविधानस्तंभाची उभारणी, तालुक्याच्या मुख्यालयी शासनमान्य लामण दिवा लावण्यात यावेत.

              ग्रामस्तरावर 8 ऑगस्ट, 2022 रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष सभा होईल. 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकाने घरासमोर रांगोळी काढावी, घराला तोरण बांधावे आणि घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. 9 ऑगस्ट रोजी गावातील वृद्ध, ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन होईल. तसेच ज्येष्ठांचा सत्कार होईल. स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात येईल. 10 ऑगस्ट  2022 रोजी स्वच्छता मोहीम, महिला मेळावा, 11 ऑगस्ट 2022 रोजी महिला बचत गट : मार्गदर्शन, गावाचा इतिहास- राष्ट्राचा इतिहास, 12 ऑगस्ट 2022 रोजी मोबाईल दुष्परिणामावर मार्गदर्शन, अर्थसाक्षरता विषयक शिबिर, 13 ऑगस्ट 2022 रोजी गावातील अंगणवाडीत अनौपचारिक शिक्षण घेणाऱ्या बालकांसाठी गोपाळांची पंगत, सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन, शेतकरी मेळावे, 14 ऑगस्ट 2022 रोजी पर्यावरण संवर्धनाची शपथ, वृक्षारोपण, स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, 16 ऑगस्ट 2022 रोजी किशोरी मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन, देशभक्तीपर कार्यक्रम, स्वराज्य फेरी आदी उपक्रम राबविण्यात यावेत. 17 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य महोत्सवाची सांगता होईल. यानिमित्त प्रभात फेरी, देशक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे आदी कार्यक्रम होतील. ग्रामस्तरावर वरील उपक्रम राबवितांना ग्रामसेवक, संरपंच, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून स्वराज्य महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी यावेळी केले.

         बैठकीस कृषी, वन, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.