नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 :  तालुक्यातील कोळदा येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.  शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.जे.आर.तडवी, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी  डॉ.राहुल चौधरी, पं.स.सदस्य कालुदादा पाडवी, डॉ.मनिष नांद्रे, सरपंच जिजाबाई पाडवी, मुख्याध्यापक बी.जे.पाटील, शारदा सोनवणे आदी उपस्थित होते.

            डॉ.भारुड यांनी यावेळी नागरिकांशी अहिराणी भाषेत संवाद साधला. ते म्हणाले, नागरिकांनी लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनाच्या संकटापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी या प्रयत्नांना साथ द्यावी. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका यांच्या सुचनांचे पालन करावे.

            कोरोना संसर्ग नियंत्रित आणण्यासाठी आणि बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावपातळीवर  सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. नागरिकांना वैद्यकीय सुविधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत सर्व मिळून संकटावर मात करायची आहे.  गावात 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            सरपंच, गावातील पदाधिकारी, पोलीस पाटील, आणि ज्येष्ठ नागरिकांमुळे कोळदा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असेही जिल्हाधिकारी म्हणाले.  दररोज 200 याप्रमाणे सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

            शिबिरासाठी 600 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली होती. दुपारपर्यंत 150 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

कन्यादान मंगल कार्यालय येथे लसीकरण

             नंदुरबार शहरातील कन्यादन मंगल कार्यालयातदेखील कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.जे.आर.तडवी, विजय चौधरी, संदीप चौधरी, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, जयेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

रोषमाळ येथे 28 व्यक्तींचे लसीकरण

            धडगाव तालुक्यातील रोषमाळ येथे 28 व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागात लसीकरणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली  लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न होत आहे.

चुलवड येथे चांगला प्रतिसाद

            धडगाव तालुक्यातील चुलवड येथे नागरिकांनी लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.  येथे दुपारपर्यंत 107 व्यक्तींना लसीची पहिला मात्रा देण्यात आली.  गावात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती.  आता बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. ग्रामसेवक खर्डे यांनी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत चांगली जागृती घडवून आणली.  आरोग्य अधिकारी अंबालाल पावरा, आरोग्य सहाय्यक के. जी. माळी, एफ. व्ही. वळवी, आरोग्य सेवक एम.आर. साबळे, अनिता वळवी, सुमन गावीत व परिचर सायसिंग वळवी यांचेही शिबिरासाठी सहकार्य लाभले.

अक्कलकुवा तालुक्यात लसीकरण शिबीर

अक्कलकुवा तालुक्यातील मौजे नाला येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले.