नंदुरबार जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम दि.०३ ऑक्टोंबर २०२३ पासून सुरू करण्यात आली असून दि. १३ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जोखमीची लोकसंख्या राहत असलेल्या विविध भागांमधून ह्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून  यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.  

या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षय रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात क्षयरोग विषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोग बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक,  क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी निवड केलेल्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन घरांमधील प्रत्येक व्यक्तीस क्षयरोग विषयी माहिती देण्यात येऊन कुटुंबातील सदस्यांपैकी ज्यांना क्षयरोगाची लक्षणे आहेत अशा सर्व संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने घेऊन त्यांना मोफत एक्सरे साठी नजीकच्या दवाखान्यात संदर्भीत करण्यात येणार आहे.

सदर मोहिमेमध्ये १६८ पथकांद्वारे ४३५८३ इतक्या घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार असून त्यामध्ये २०७०६७  इतकी लोकसंख्या तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी, मोफत एक्सरे तपासणी नजीकच्या सरकारी दवाखान्यात करून निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येऊन निदान झालेल्या क्षयरुणांना उपचार सुरू असेपर्यंत  त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रु  निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी शासनामार्फत देण्यात येतील.

या मोहिमेचे उद्घाटन नागरी आरोग्यकेंद्र, नंदुरबार येथे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पाटील, जिल्हा समन्वयक  श्री. शिरीष भोजगुडे, राहुल वळवी, समुवेल मावची, रामचंद्र बारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पाटील, मनोज भावसार, जयंत पाटील, विशाल वारुळे, सुजाता बच्छाव यांनी परिश्रम घेतले.