नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागानी योजना व लाभार्थ्यांची माहिती त्वरीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज  दिले आहेत.

   ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, लक्ष्मण पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, सर्व  विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून विविध योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याने सर्व विभागानी आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, पात्र लाभार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह अचूक माहिती गुगल शीट वर त्वरीत सादर करावी.

 प्रत्येक विभागाने दररोज केलेल्या कामाचा अहवाल गुगल शिटवर उपलब्ध करुन द्यावा. माहिती भरण्यासाठी आपल्या विभागातील जबाबदारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत तालुकास्तरावर कार्यक्रम राबवितांना मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी. तालुकास्तरावर मोठया प्रमाणात लाभ देतांना  स्थानिक लोकप्रतिनिधीना सहभागी करुन त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. सर्व तहसिलदारांनी जातीचे दाखले, नॉन क्रिमिलर, सातबारा, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड वाटप करण्यासाठी नियोजन करावेत. प्रत्येक तालुकास्तरावर हा कार्यक्रम होणार असल्याने यासाठी सर्व विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

जत्रा शासकीय योजनांची उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम  तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.