नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 56 हजार कलाकारांना  प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कलाकारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.

एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत.

एकल कलाकाराची निवड करण्यासाठी ‍ जिल्हास्तरीय समितीमार्फतलाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येईल.जिल्हास्तरीय समितीने  पात्र केलेल्या कलाकाराची शिफारस यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.

 योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.