नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे  आधार व मोबाईल सीडिंग करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 31 जानेवारीपर्यंत शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे  आधार व मोबाईल क्रमांक जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. अद्यापही सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी करून 10 फेब्रुवारी पूर्वी या  लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक जोडण्याचे नियोजन तहसील कार्यालय स्तरावर करण्यात येणार आहे.

            आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल. लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदार किंवा तहसील कार्यालयामार्फत आधार  व मोबाईल क्रमांक जोडणी करून घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी कळविले आहे.