नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शहादा तालुक्यातील मौजे जयनगर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. मिनाबाई अंकुश सोनवणे यांचे विरुद्ध दाखल झालेल्या तसेच 25 जुलै 2022 रोजी तीन चतुर्थश मताने मंजूर झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयनगर,ता. शहादा येथे 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष ग्रामसभा घेणेकरीता प्रचलित नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक राहील. आवश्यकता असल्यास सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करणेकामी शिरगणना करण्याच्या साध्या पद्धतीने मतदान घेण्यात येईल. यासाठी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी ग्राह्य धरुन 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. या दिवशी विशेष ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावर चर्चा होईल इतर विषयांवर चर्चा होणार नाही.
विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला आहे असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.
विशेष ग्रामसभेत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर व अन्य अनुषंगिक बाबींचे पालन करणे आवश्यक असेल. ग्रामसभेमध्ये येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक राहील असे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.