नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला निनावी सुचनेनूसार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह मु.पाष्टी ता.शिंदखेडा जि.धुळे येथे 12 मे रोजी तर नवापूर तालुक्यातील बालाहाट येथील अल्पवयीन मुलीचा बाल विवाह 13 मे होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यावर त्वरीत कार्यवाही करुन या दोन्ही अल्पवयीन मुलीचा बाल विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. तसेच दोन्ही पक्षातील वधु व वर माता पिता यांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन केले व बालविवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतूदीबाबत माहिती दिली.
यावेळी बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणूका मोघे, जन साहस संस्थेचे जिल्हा समन्व्यक विकास मोरे, संतोष निकुभे, समुपदेशिका अनिता गावीत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकास तसेच गावातील पोलीस पाटील, सरंपच यांनी मोलाचे सहकार्य केले.