नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  अमृत सरोवर अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती.खत्री म्हणाल्या की, नरेगा योजनेमधून जिल्ह्यात तलावातील गाळ काढण्याची अधिकाधिक कामे घेण्यात यावी. नरेगामधून तलावाच्या परिसरात वृक्षारोपण, गावातील विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डे इ. कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या तलावातून काढलेला गाळ ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे नियोजन असून पावसाळ्यात तलावात साठणाऱ्या पाण्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी वाढणार आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, पिटीओ कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.