नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने आपले घर, इमारतीवर तिरंगा फडकवावा. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, वसतिगृह, निवासस्थान, दुकाने, आस्थापनावर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविला जाईल याबाबत काटेकोर नियोजन करावे. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांना याबाबत सूचना द्याव्यात. प्रत्येक विभाग, उपविभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, सर्व कार्यालयाच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर ‘घरोघरी तिरंगा’ ही टॅगलाईन तसेच तिरंगाचे चित्र प्रदर्शित करावे.

सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अप इत्यादी समाजमाध्यमातून तिरंगा विषयक चित्र, संदेश प्रदर्शित करुन याची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. शिक्षण विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करुन या उपक्रमात पालक व नागरिकांना सहभागासाठी प्रेरीत करावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करावे.

            सर्व शासकीय, निमशासकीय इमारतींबरोबर खाजगी इमारतींवर अथव राहत्या घरावर तिरंगा फडकविण्याबाबत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये या उपक्रमाची जनजागृती करावी.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृतीसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, पोस्टर इत्यादीची निर्मिती केली असून ते https://mahaamrut75.org  या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा वापर सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी करावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सर्व विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्रे, चित्रफिती शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरुन उपक्रमाची अधिकाधिक माहिती देश पातळीवर पोहचेल.

‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी परिपत्रकान्वये केले आहे.