नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण असलेली कामे संबंधित यंत्रणांनी त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस उपवनसरंक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) प्रदीप लाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असल्याने मनरेगा अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मनरेगाची कामे चांगली सुरु असून उर्वरीत तालुक्यांनी मनरेगाच्या कामांना गती द्यावी. जिल्ह्यातील मोठया ग्रामपंचायतीमध्ये अधिक प्रमाणावर कामे घेण्यात यावीत. प्रत्येक गावात 500 मनुष्यदिवस निर्माण होतील इतके कामे शेल्फवर ठेवावीत.
जिल्हा परिषदेने सन 2022-2023 च्या नियोजन आराखड्यास व सन 2021-2022 च्या पुरवणी आरखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार अधिकाधिक कामे सुरु करण्यात यावीत. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना प्राधान्याने कामे उपलब्ध करुन द्यावी. मनरेगा अंतर्गत सन 2019-2020 पुर्वीची अपुर्ण कामे प्राधान्याने पुर्ण करावी. यापैकी घरकुलाच्या अपुर्ण कामाकडे गट विकास अधिकाऱ्यांनी व्यक्तीशः लक्ष द्यावे. मजुरांना विहित मुदतीत मजुरी प्रदान होईल याकडे लक्ष द्यावे. मनरेगाच्या कामांचे जिओ टॅगिंक पुर्ण करावेत असे त्यांनी सांगितले.
श्री. मोरे म्हणाले की, मनरेगा अंतर्गत कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत व इतर विभागाकडून मोठ्या प्रमाणात कामे चालू असून जिल्ह्यात 1 हजार 826 कामे सुरू असून 19 हजार 156 मजूर कामावर आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यात 421 कामे सुरु असून 4 हजार 819 मजूर, अक्राणी 383 कामे सुरु असून 9 हजार 93 मजूर, नंदुरबार 273 कामे सुरु असून 1 हजार 961 मजूर, नवापूर 170 कामे असून असून 1 हजार 355 मजूर, शहादा 303 कामे सुरु असून 1 हजार 57 मजूर तर तळोद्यात 276 कामे सुरु असून 871 मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. बैठकीस तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.