नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावी आणि आरोग्य विभागाने कोरोना परिस्थिती लक्षात घेता आवश्यक दुरूस्तीची कामे त्वरीत करून घ्यावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू नये, केवळ दुरूस्तीची कामे करण्यात यावी. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.  संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे.

धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त  गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे. कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.

आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. प्रथमोपचार गटाची बांधणी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय करावी. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी.

 सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात.

नगरपालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पर्जन्यमान आदी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. पुरवठा विभागाने आपत्ती काळात पुरेसा धान्यसाठा वितरणाबाबत नियोजन करावे. महावितरणने आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत,  असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.