नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज अक्कलकुवा तालुक्यातील देहली येथील प्रकल्पाला भेट दिली व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, अधिक्षक अभियंता सु,स,खांडेकर, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, तहसिलदार सचिन म्हस्के, उपअभियंता किशोर पावरा, कनिष्ठ अभियंता विकास शिंदे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, सरपंच बबलु पाडवी, चंदु पाडवी, ईश्वर तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो असून आपल्या समस्या निश्चित सोडविल्या जातील असे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागाने भूमिहिन दारिद्ररेषेखालील आदिवासींसाठी सबळीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत 4 एकरापर्यत जिरायती जमीन रू.5 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने व 2 एकरापर्यत बागायती जमिन रू.8 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने देण्याची दरतूद आहे. त्यानुसार 102 प्रकल्पग्रस्तांसाठी 163.20 हेक्टर जमीनीकरिता अंदाजित एकूण 8 कोटी 18 लाख 28 हजार 480 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना, ग्रमापंचायत इमारत बांधकाम, स्मशानभूमी, समाजमंदिर, तसेच सांस्कृतिक भवनासाठी तसेच या भागातील विविध विकासकामांसाठी आदिवासी विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतुद करण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या सागाच्या घरांना घसारानुसार रक्कम देण्यात येईल. ज्या लोकांच्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना मच्छीमार सोसायटी स्थापन करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल तसेच त्यांना मत्स्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांना सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ मिळावा, भूमिहीन जमीन, घरकुल, मनरेगा, शेळीपालन, इत्यादी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी केली.
प्रास्ताविकात श्री.चिनावलकर यांनी देहली प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी आंबाबारी, रायसिंगपूरा, दसरापादर, रतनबारा, रांझणी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक व लोकसंघर्ष मोर्च्याचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.