नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कार्यालयात येणाऱ्या आणि सभोवती वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून न्याय देण्याची व त्याचा सन्मान राखण्याची सर्वांनी स्विकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.डी.चौधरी, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर, महेश सुधाळकर, शाहूराज मोरे, जिल्हा विधी अधिकारी दिपाली कलाल आदी उपस्थित होते.

            डॉ.भारुड म्हणाले, नागरिकांची कामे तात्काळ होतील याची दक्षता घ्यावी. शासनाचे निर्णय आणि कायद्याची योग्‍य प्रकारे अंमलबजावणी करून सामान्य माणसाच्या मानवाधिकाराचे रक्षण चांगल्यारितीने करता येईल. मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आपले काम कर्तव्य भावनेने करण्याचा निश्चय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

            डॉ.चौधरी म्हणाले, कोरोनाकाळात प्रशासनाने चांगली कामगिरी करून नागरिकांच्या आरोग्य विषयक अधिकारांचे एकप्रकारे रक्षण केले. माणसाच्या सर्व प्रकारच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी 1993 मध्ये मानवाधिकार कायदा अस्तित्वात आला. माणसाचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान हा या कायद्याचा गाभा आहे. मानवाधिकार कायदा आणि संविधानालाही आर्थिक आणि सामाजिक समता अभिप्रेत आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. माणसाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे बजावल्यास इतरांच्या मानवाधिकारांचे रक्षण उत्तमरितीने होईल असेही ते  म्हणाले.

            संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार कायदा संमत करणे ही मानवी इतिहासातील महत्वाची घटना आहे. आजही मानवजातीसमोर अनेक प्रश्न असताना सभोवती असलेल्या व्यक्तीच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन श्री.क्षिरसागर यांनी केले.

            कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.