नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून योजनेसाठी पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत (आय.आर 1) कर्ज मर्यादा रु.10 लाखापर्यंत असून ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम,लघु व मध्यम उद्योग,उत्पादन, व्यापार व विक्री व सेवा क्षेत्रासाठी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखाच्या मर्यादेत असावे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील. अर्जदाराने महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. अर्जदार कोणत्याही बँकेचा, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्ज करतेवेळी सदर प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराचे कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) आणि तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थ्यांने मध्येच नियमित कर्जफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही. लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल.
गट कर्ज व्याज परतावा योजनेत (आय.आर-2 ) कर्ज मर्यादा रु.10 ते 50 लाखापर्यंत असून ही योजना कृषी सलंग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा क्षेत्रासाठी आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील. अर्जदाराने महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिंक कौटुंबिक उत्पन्न रु.8 लाखाच्या मर्यादेत असावेत.
या दोन्ही योजनेचा वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आधारकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शाळेचा दाखला आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार (02564-210666) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.आर.पवार यांनी केले आहे.