नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय मान्सुन-2021 पूर्व तयारीबाबत गाभा आणि नवसंजीवनी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. भारुड म्हणाले मातृत्व अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर वितरीत करण्यात यावेत. शासनाच्या कोणत्याही योजनेत खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. सिकलसेलचे किट धडगांव व अक्कलकुवा तालुक्यात वितरीत करावे. स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी एक महिन्याची विशेष मोहिम राबवावी. मे महिन्याच्या अखरेपर्यंत पोषण आहाराचे वितरण करण्यात यावे. पूर्ण झालेल्या अंगणवाड्या पावसाळ्यापूर्वी ताब्यात घ्याव्यात. अंगणवाडीत पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.अपूर्ण अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाला गती द्यावी.
बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी तसेच समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.