नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नर्मदा किनारच्या भागातील गावात तेथील पाणीपातळी लक्षात घेऊन विहिरी तयार करण्यास जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, स्थलांतर रोखण्यासाठी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. विहीर बांधल्यामुळे बागायती शेती करणे शक्य होईल. इतरही कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी. डिसेंबर अखेर सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण होईल असे नियोजन करावे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बांधकामासाठी प्रस्ताव सादर करावा. नवोदय विद्यालयाच्या रस्त्याचे काम करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. पुढील वर्षी वन विभागाने अधिकाधिक रोपवाटिका तयार करण्यावर विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.