नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2021 या दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या युवकांसाठी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नवमतदारांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
5 डिसेंबर व 6 डिसेंबर 2020 तसेच 12 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिमेदरम्यान वंचित मतदार आपली नाव नोंदणी अर्ज क्र. 6 भरुन करु शकतील. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना आपल्या नावामध्ये, वय, पत्ता इतर काही त्रुटी असतील बीएलओकडे कागदपत्रे देऊन स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या मतदार यादीतील नोंदी, फोटो, तपासणी करुन आवश्यकता असल्यास अर्ज क्र. 8 भरुन सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरुन वगळणी करता येतील.