नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्हा परीषद अंतर्गत 11 निवडणुक विभाग आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या एकूण 14 निर्वाचक गणासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार 19 जुलै 2021 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होईल तर 20 जुलै 2021 रोजी सकाळी 10 पासुन मतमोजणी होईल.

 सर्वोच्च न्यायालाने 4 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणूका तात्काळ प्रभावाने रद्दबादल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत 8- खापर, 9- अक्कलकुवा,24-म्हसावद, 29-लोणखेडा, 31- पाडळदे बु, 35-कहाटुळ, 38-कोळदे, 39-खोंडामळी, 40-कोपर्ली, 41-रनाळा, 42-मांडळ या 11 निवडणूक विभागासाठी आणि पंचायत समितीअंतर्गत  16-कोराई, 49-सुलतानपूर, 51-खेडदिगर, 53-मंदाणे, 58-डोंगरगांव, 59-मोहिदे तह, 61-जावेद तजो, 62-पाडळदे ब्रु, 66-शेल्टी, 73-गुजरभवाली, 74-पातोंडा, 76-होळ तर्फे हवेली, 85-नांदर्खे आणि 87-गुजरजांभोली या 14 निर्वाचक गणासाठी पोट निवडणुक होणार आहे.

 निवडणुकीच्या तारखांची सूचना व  निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार 29 जून 2021 रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी मंगळवार 29 जून 2021 ते सोमवार 5 जुलै 2021  (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) असेल. मंगळवार 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येऊन त्यावर निर्णय देण्यात येईल आणि छाननीनंतर लगेचच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार 9 जुलै 2021 असेल.

जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख सोमवार 12 जुलै 2021 राहील, तर अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. जेथे अपील नाही तेथे उमेदवार मागे घेण्याची तारीख सोमवार 12 जुलै 2021 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ) आणि जेथे अपील आहे तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख बुधवार 14 जुलै 2021 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ) राहील.

अपील नसलेल्या ठिकाणी सोमवार 12 जुलै 2021 रोजी तर जेथे  अपिल आहे तेथे बुधवार 14 जुलै 2021 रोजी (दुपारी 3.30 नंतर ) निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निशाणी वाटप होईल. सोमवार 19 जुलै 2021 रोजी सकाळी 7-30 ते  सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होईल. मंगळवार 20 जुलै 2021 रोजी सकाळी 10 पासून  मतमोजणीस सुरूवात होईल. शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येईल.

निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदार संघात लागू झालेली असली तरी  पोट निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील  मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. मतदानाच्यावेळी मतदार कर्मचारी तसेच मतदारांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.