नंदुरबार : पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून करोना संसर्ग
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या तापाच्या रुग्णांची माहिती तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमएच्या प्रतिनिधींसोबत आयेाजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके, डॉ.राजेश वसावे,आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश वळवी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.राजेश कोळी, डॉ.अनिकेत नागोटे, डॉ.गिरीष तांबोळी, आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, तापाच्या रुग्णात करोनाची लक्षणे असण्याची शक्यता लक्षात घेता दक्षता घेणे
आवश्यक आहे. विशेषत: तापाचे रुग्ण रेडझोनमधील जिल्ह्यात प्रवास करून आलेले असल्यास अशा प्रत्येक रुग्णाचे स्वॅब घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात यावी. दोन ते तीन दिवसात लक्षणे कायम असल्यास अशा रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहतील आणि आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा राहील, याची दक्षता घ्यावी. मुख्यालयी उपस्थित न राहणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. प्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सीमीटर ठेवण्यात यावे. तालुका स्तरावर क्वॉरंटाईन केंद्राची क्षमता दुप्पट करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी करून ठेवावी व तेथील सुविधेचा आढावा घ्यावा. क्वॉरंटाईन केंद्रातील व्यक्ती घरी परतल्यानंतर ती जागा सॅनिटाईज करून स्वच्छतेवर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी, आयएमएचे सदस्य उपस्थित होते.