नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  तळोदा येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा,  तहसीलदार गिरीश वखारे, सहा गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे, मुख्याधिकारी अनंत जवादवार आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील एकूण लसीकरण केंद्रे, केंद्रनिहाय लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची संख्या आणि मनुष्यबळाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी, जनतेचा प्रतिसाद याबाबत माहिती घेण्यात आली.

प्रत्येक लसीकरण केंद्र निहाय आराखडा तयार करण्यात यावा.  नगरपलिका क्षेत्रात लसीकरणासाठी वॉर्डनिहाय नियोजन करून त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. तलाठी,ग्रामसेवक,शिक्षक, आ रोग्य कर्मचारी,पोलीस पाटील  यांनी एकत्रितरित्या गावागावात जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे , अशा सूचना श्री.पाटील यांनी केल्या.

बैठकीस शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी,  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पर्यवेक्षक तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.