नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  शहादा तालुक्यातील बामखेडा येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

गावातील काही नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र गैरसमजामुळे अनेकांनी अद्याप लस घेतलेली नाही. बामखेडाचे सरपंच मनोज चौधरी हे स्वत:  तरुण आणि उच्च शिक्षित असल्याने त्यांनी पूर्ण गावाचे लसीकरण करण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने शिक्षकांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. गावात नुकतेच रुजू झालेले ग्रामसेवक मनीष रामोडे यांनीदेखील या कामात पुढाकार  घेतला आहे.

नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना शिक्षकांचे म्हणणे गांभिर्याने घेतले जात नव्हते. नागरीक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी लोककलेचा उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सोंगांना गावात नाचविण्यात आले.

हलगीचा आवाज  आणि विविध रुपातील सोंगे पाहून गावकरी त्यांच्याभोवती एकत्र आले. सरंपंच चौधरी आणि शिक्षकांनी त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले व लसीकरणाचे आवाहन केले. या उपक्रमात ग्रामविकास संस्थेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांनीदेखील चांगले सहकार्य केले.

गावातील प्रत्येक नागरिकांचे लसीकण होईपर्यंत जनजागृती सुरू ठेवणार असल्याचे श्री.रामोडे आणि श्री.चौधरी यांनी सांगितले.