नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा सन 2022 या वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 1 मे,महाराष्ट्र दिन रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी मनीषा खत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधिताना प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये रोख स्वरुपात तसेच युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस सन्मानचिन्ह, गौरवपत्र व 50 हजार या प्रमाणे देण्यात येणार आहे.
सन 2022 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक ) श्री.मुकेश नागराज पाटील यांना राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, शिक्षण क्षेत्रात कार्य, युवकांचा सर्वागींण विकासासाठी कार्य,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील कार्य,इत्यादी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती) साठी कु.तेजस्विनी मोहन चौधरी यांना महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्य, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय केलेले कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच 2022 साठी जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) युवकमित्र परिवार,कोठली ता.शहादा जि.नंदुरबार यांना राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटकासाठी केलेले कार्य, अनुसूचित जमातीसाठी कार्य, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, युवकांचा सर्वागींण विकास व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.