नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : हरित सातपुडा अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. बैठकीस परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर.रोकडे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले की, जिल्ह्यात अभियानाअंतर्गत प्रत्येक शाळेच्या परिसरातील मोकळी जागा, टेकडी तसेच उपलब्ध डोंगर व मैदाने याठिकाणी वृक्ष लागवड करावयाची आहे. प्रत्येक शाळेत उपलब्ध सुविधेनुसार नर्सरी उभारणे, मातीनाला बांध तयार करणे, पाणी अडवणे – जिरवणे यासारखे उपक्रम प्रात्यक्षिक स्वरुपात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करायचे आहेत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची तीन गटात विभागणी करून त्यांना समजेल अशा स्वरुपात चित्र व मोजक्या शब्दांच्या माध्यमातून पुस्तक तयार करुन आठवड्यातून अर्धातास वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षांची जोपासणा करणे याबाबतचे संस्कार विद्यार्थ्यांवरकरावयाचे आहेत, असे त्यांनी सांगीतले.
पुस्तक तयार करतांना झाडाचे महत्व, त्यापासून मिळणारी सावली, वनौऔषधी उपयोग, पक्ष्यांना होणारा फायदा, जमिनीची धुप न होऊ देण्यात झाडांची भुमिका, मिळणारी फळे, झाडापासून मिळणारे ऑक्सीजन, पर्यावरण रक्षणात झाडांची भुमिका याबाबत चित्रात्मक स्वरुपात व बोलीभाषेत मजकूर तयार करावा. वृक्षारोपणासाठी मोठया प्रमाणात रोपांची आवश्यकता असल्याने ‘शाळा तेथे रोपवाटीका’ हा उपक्रमदेखील घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
ही योजना यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी लहान-लहान व्हीडीओ तयार करुन प्रत्येक शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत या व्हीडीओच्या माध्यमातुन उपक्रमाची माहिती पोहोचवावी. बालमनावर वृक्षारोपणाचे महत्व पटवुन देणारे संस्कार करण्याचे पवित्र कार्य शिक्षण विभागाने यशस्वी करावे. फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध अशा विविध कामांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे. वरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधीक स्वरुपात श्रमदान करुन घेत वृक्षारोपणात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी केले. उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच शिक्षणाधिकारी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.