नंदुरबार, दि.7 (जिमाका वृत्तसेवा): सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, महसूल, वन, रोजगार हमी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाच वर्षांत नंदुरबार जिल्ह्यात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन हरित नंदुरबारसाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. असे निर्देश प्रधान सचिव, वने तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी  यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात झालेल्या वन, कृषी व रोहयो विभागाच्या आढावा बैठकीत पालक सचिव श्री. रेड्डी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, मुख्य वनसंरक्षक, (धुळे) दिगंबर पगार उपस्थित होते.

पालक सचिव श्री. रेड्डी म्हणाले, सातपुडा हे महाराष्ट्राचे वैभव असून या भागात वन विभागाच्या मोठ्या प्रमाणात वन जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व वन विभागाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीची मोहिम राबवावी. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपांची आवश्यकता लक्षात घेवून  वन विभागाने रोजगार हमी योजनेतंर्गत वन विभाग व सामाजिक वनीकरणच्या रोपवाटीकेत जास्तीत जास्त रोपे तयार करावी. वन विभागाच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर वृक्ष लागवडीसाठी सुक्ष्म नियोजन करावे. वृक्ष संवर्धनाबरोबरच स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी दिर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या आंबा, पेरु, सिताफळ, बाबु, आवळा, चारोळी या वृक्षांची रोपे तयार करावीत. कृषी विभागाने फळबाग लागवड योजनेतंर्गत जिल्हृयात जास्तीत जास्त फळबाग लावगडीचे उद्दीष्ट ठेवावे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वृक्षलागवड व जंगलाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांचे प्रबोधन करुन त्यांना वृक्ष संवर्धनातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी वन विभागाने मनरेगातंर्गत अधिकाधिक कामे त्यांना उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, हरित नंदुरबार अभियान राबविण्यासाठी आवश्यक निधी व सर्व विभागांचे सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल. मुख्य वनसंरक्षक श्री. पगार यांनी वन विभागामार्फत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री.मोरे, उपवनसंरक्षक श्री.भवर, सामाजिक वनीकरणाच्या रेवती कुलकर्णी, कृषी विभागाचे श्री. भागेश्वर यांनी त्यांच्या विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रांताधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, कल्पना निळ-ठुंबे, नितीन सदगीर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सामाजिक वनीकरणाच्या रेवती कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, सर्व तहसिलदार, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.