नंदुरबार : कोविड-19 चा संसर्ग जिल्ह्यात अधिक प्रमाणात फैलू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगवर भर द्यावा आणि नागरिकांना याबाबत माहिती द्यावी. तसेच लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावे लागणाऱ्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 उपाययोजनांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जि.प. अध्यक्षा सीमा वळवी, खासदार हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर संसर्ग जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक करावे. पोलीस, रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीदेखील कर्तव्य बजावताना विशेष दक्षता घ्यावी.
शासनाने बाहेरील जिल्ह्यातून मजूरांना परत आपल्या जिल्ह्यात येण्याची अनुमती दिली असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. सीमेवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. महाराष्ट्रातील विविध भागात गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना आणण्यासाठी त्यांची माहिती संकलीत करावी व त्यांच्या वाहतूकीसाठी वाहन व्यवस्था करावी. आदिवासी विभागातर्फे यासाठी निधी देण्यात येईल. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होमक्वॉरंटाईन करण्यात यावे. त्यांना एप्रिल महिन्याचे धान्य त्वरीत उपलब्ध करून द्यावे.
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा उपयोग करावा. बँकेने जनतेला माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेपकाचा उपयोग करावा. स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन जनतेला माहिती देण्याची व्यवस्था करावी. उन्हापासून बचावासाठी बँकेबाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात यावी. ग्राहक सुविधा केंद्र किंवा पोस्टाच्या माध्यमातून अधिकाधीक व्यवहार होतील याचे नियोजन करावे.
कोविड-19 बाबत आरोग्य विभागाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करावे. नागरिकात हात धुण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंगबाबत जागृती करण्यात यावी. जिल्ह्याने संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून जिल्हा पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्य वितरण वेगाने व्हावे आणि गैरप्रकार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयाला आवश्यक नवीन 5 डायलिसीस यंत्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रतिबंधीत क्षेत्रातील 5 हजार 86 कुटुंबातील 25 हजार 306 व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सतत 14 दिवस करण्यात येणार आहे. आतापर्यत 443 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील 332 निगेटीव्ह आले असून 17 पॉझिटीव्ह आले आहेत. एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
एकूण पॉझिटीव्ह 17 रुग्णांपैकी तीन मूळ संसर्ग झालेले असून इतर 14 त्यांच्या संपर्कातील आहेत. जिल्ह्यात शहादा 3, नंदुरबार 1 आणि अक्कलकुवा 1 असे 5 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. या क्षेत्रातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी 59 पथक तयार करण्यात आले आहेत, असे श्री.गौडा यांनी सांगितले.
यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रतिबंधात्मक उपयायोजनेबाबत विविध सूचना मांडल्या. जिल्ह्यात उच्च जोखिमीचे 196 आणि कमी जोखीमीच्या 26 व्यक्ती असून 49 व्यक्तींना होमक्वॉरंटाईन तर 173 व्यक्तींना गव्हर्नमेंट क्वॅारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.